एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:16 AM2022-01-19T10:16:56+5:302022-01-19T10:20:26+5:30

एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

editorial on labor courts decision that st strike is illegal | एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी खूप जास्त ताणले; आता तुटू देऊ नका!

googlenewsNext

अखेर ज्याची आशंका होती तेच झाले! अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून सुरू असलेला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सोमवारी कामगार न्यायालयाने दिला. एसटीच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ काळ चाललेला संप! वेतनवाढ आणि एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या संपकरी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्यापैकी वेतनवाढ ही मागणी बव्हंशी पूर्ण झाली आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मात्र मान्य होण्यासारखी नव्हतीच! भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी प्रारंभी या मागणीला बळ दिले होते. परंतु वस्तुस्थिती ही आहे, की त्या पक्षाचे सरकार सत्तेत असते तरी त्यांनाही ती मागणी मान्य करता आली नसती! तांत्रिक अडचणी हे त्यामागचे सर्वात प्रमुख कारण; पण त्यापेक्षाही मोठे कारण हे आहे, की सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी मान्य केल्यास, राज्य सरकारच्या अखत्यारीतील इतरही अनेक महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनीही तशाच मागण्या रेटून धरल्या असत्या.



विलिनीकरणाची मागणी मान्य होणे शक्य नाही, हे संपकरी कर्मचाऱ्यांनी समजून घेणे गरजेचे होते. दुर्दैवाने काही निहित स्वारस्य असलेल्या मंडळीनी एसटी कर्मचाऱ्यांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि त्यांना संप रेटून धरण्यास भाग पाडले, असे दिसते. वस्तुत: सरकारने कमाल ४२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ यापूर्वीच जाहीर केली आहे. त्या टप्प्यावर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असता आणि इतर वैधानिक मार्गांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठीचा लढा सुरु ठेवला असता, तर त्यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती गमावण्याची वेळ आली नसती. दुर्दैवाने त्यांना ते तारतम्य बाळगता आले नाही आणि त्यामुळेच आज संप बेकायदा ठरविला गेल्याचे बघण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सर्वसामान्य मराठी माणसाचे एसटीसोबत एका वेगळेच जिव्हाळ्याचे नाते आहे. तो दैनंदिन प्रवासासाठी `लाल परी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या सर्वसाधारण बसेसवरच अवलंबून असतो. त्याला कोणत्याही सुखदु:खाच्या प्रसंगाच्या निमित्ताने प्रवास करावा लागतो, तेव्हा एसटीच वर्षानुवर्षांपासून त्याच्या सेवेत तत्पर असते. नादुरुस्त, गळक्या, खडखडाटामुळे डोके उठवणाऱ्या एसटी बसेसला मराठी माणूस लाख शिव्याशाप वाहत असेल, प्रसंगी विलंबाने धावणाऱ्या बसेससाठी कर्मचाऱ्यांवर त्याची चिडचिड होत असेल; पण प्रवासासाठी त्याची पहिली पसंती एसटीलाच असते! त्यामुळेच संपाच्या प्रारंभीच्या टप्प्यात सर्वसामान्यांची संपूर्ण सहानुभूती संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना लाभली होती. दुर्दैवाने आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. वाचकांच्या पत्रव्यवहारात प्रसिद्ध करण्यासाठी आमच्याकडे जी पत्रे प्राप्त होतात, त्या पत्रांचा बदललेला सूर त्याची प्रचिती देत आहे.



सरकारने वेतनवाढ जाहीर केल्यानंतर आता संपकरी कर्मचाऱ्यांनी पुरे करायला हवे, तुटेपर्यंत ताणू नये, अशीच सर्वसामान्य माणसाची भावना होती. कोणत्याही लढाईत कुठे थांबायला हवे, याची सेनापतींना जाण असणे फार महत्त्वाचे असते. प्रत्येक लढाईचा अंत एका पक्षाच्या संपूर्ण नि:पाताने होत नसतो. तह हादेखील लढाईतील महत्त्वाचा भाग असतो. प्रत्यक्ष खडाजंगीपेक्षाही यशस्वी तह करणे यामध्येच सेनापतीचे खरे नैपुण्य असते. ती जाण ज्यांना असते, ते इतिहासाच्या पानांवर अजरामर होतात; अन्यथा प्रचंड शूर योद्ध्यांचेही नामोनिशाण शिल्लक राहात नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करीत असलेल्या मंडळींना दुर्दैवाने ती जाण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी, या प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे.

संपापूर्वी अर्धीमुर्धी भाकर खाऊन निदान पित्याच्या छत्राखाली जगत असलेली त्यांची चिल्लीपिल्ली आज उघड्यावर आली आहेत. आताही संपाच्या नेत्यांनी समजूतदारपणा दाखवावा आणि जे पदरात पडले आहे, ते पावन करून घेत, उर्वरित मागण्यांसाठी वैधानिक मार्गांनी लढा द्यावा! अन्यथा गत काही दिवसात संपकरी कर्मचाऱ्यांची जी फाटाफूट सुरु झाली आहे, तिला न्यायालयाच्या निर्णयामुळे आणखी वेग येण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप पासंगालाही पुरणार नाही, एवढा प्रदीर्घ काळ संप मुंबईतील गिरणी कामगारांनी चालवला होता. त्याचे काय झाले, हे संपकरी कर्मचाऱ्यांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांनी खूप जास्त ताणले आहे, आता तुटू देऊ नये!

Web Title: editorial on labor courts decision that st strike is illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.