कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 09:01 AM2021-12-07T09:01:11+5:302021-12-07T09:06:03+5:30

ज्या देशाची राखीव फळी बलाढ्य, तो देश कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. सध्या भारताकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा शानदार संघ आहे.

The fire of revenge for the Test defeat finally calmed down | कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली 

कसोटी पराभवाच्या बदल्याची आग अखेर शांत झाली 

Next

किशोर बागडे

वरिष्ठ उपमुख्य संपादक लोकमत, नागपूर

मुंबईतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानेन्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव करत दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. धावांचा विचार केल्यास भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला.  ४ ऑक्टोबर २०१८ ला राजकोटमध्ये वेस्ट इंडिजला एक डाव २७२ धावांनी हरविले होते. तो भारताचा सर्वांत मोठा विजय मानायला हवा. तथापि ऐतिहासिक  विजयाचा विचार केल्यास, इंग्लंडने एक डाव ५७९ धावांनी ऑस्ट्रेलियाला ओव्हलवर १९३८ ला हरविले होते. कसोटी क्रिकेटमध्ये हा सर्वांत ऐतिहासिक विजय मानला जातो. भारतासाठीदेखील मुंबईचा विजय ऐतिहासिक यासाठीच ठरतो, कारण विश्व कसोटी विजेत्या न्यूझीलंडचा ३७२ धावांच्या फरकाने फडशा पाडला.

सोमवारच्या विजयासह न्यूझीलंडकडून अव्वल स्थान हिसकावून घेत टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन संघ बनला. किवी संघाने जून २०२१मध्ये भारताकडून हा दर्जा हिरावून घेतला होता. त्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकून आपले स्थान पक्के केले होते. पण आता टीम इंडियाने गोड बदला घेत कसोटीतील सर्वात मोठा विजय नावावर केला. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली विराट कोहलीचा हा पहिला विजय ठरला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उभय संघात सुरू असलेले बदल्याचे अग्निकुंड थंडावले असावे.
भारताच्या मालिका विजयातून एक बाब प्रकर्षाने पुढे आली, ती ही की, भारतीय संघात राखीव फळी (बेंच स्ट्रेंग्थ) अतिशय मजबूत आहे.  या सामन्याआधी मयांक जवळपास बाहेर बसेल असे चित्र होते. पण मयांकने पहिल्या डावात दीडशे आणि दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली. जयंतने फलंदाजीतही चुणूक दाखविली, शिवाय न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद करीत ‘पळता भुई थोडी’ केली. राखीव फळीतील युवा खेळाडूंना पुढे आणण्याचे काम रवी शास्त्री-कोहली काळात सुरू झाले असेल, पण द्रविड-कोहली यांच्या नेतृत्वात राखीव फळी आणखी भरारी घेईल यात शंका नाही.

ज्या देशाची राखीव फळी अधिक बलाढ्य, तो देश कसोटीसारख्या प्रकारात दीर्घकाळ वर्चस्व गाजवू शकतो. कसोटीसारख्या प्रकारात प्रतिभावान खेळाडूंची फळी असणे फारच उपयुक्त ठरते. सध्या भारताकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा शानदार संघ आहे.
हा मालिका विजयदेखील नवी उभारी देणारा ठरतो. काहीच दिवसांआधी भारतीय संघ टी-२० विश्वचषकात दारुण रीतीने पराभूत झाला. त्यामागे न्यूझीलंड कारणीभूत ठरला. त्याआधीही याच न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी (विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) अंतिम सामन्यातही भारताला धूळ चारली होती. त्याचा हा वचपा आहे. आधी टी-२० मालिकेत रोहितच्या नेतृत्वात ‘क्लीन स्वीप’ केले. आता विराटच्या नेतृत्वात कसोटीत नमविले. कानपूर कसोटीतही भारत जिंकू शकला असता. पण मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडने दहाव्या गड्यासाठी उपयुक्त भागीदारी करीत भारताला विजयापासून दूर ठेवण्यात यश मिळविले होते.

श्रेयस अय्यरला संधी मिळताच त्याने दोन्ही हातांनी संधीचे सोने केले. पदार्पणात दमदार शतक झळकाविणाऱ्या श्रेयसने दुसऱ्या डावातही संघ संकटात असताना शानदार अर्धशतकी योगदान दिले. संघावर संकट आले की, राखीव फळीतील हे खेळाडू मदतीला धावून येतात. ज्यांना ज्यांना संधी मिळते ते युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करतात. भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी हे चांगले लक्षण आहे. टी. नटराजन, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, ऋषभ पंत, हनुमा विहारी या सर्वांनी ‘मॅचविनिंग’ खेळी केली. शिवाय संकटकाळात पराभव टाळण्याचे काम केले. ऋषभला त्यावेळी रिद्धिमान साहाच्या जागी यष्टिरक्षणाची संधी मिळाली होती. युवा खेळाडूंची ही ताकद भारतीय संघाच्या झंझावाताची कहाणी अधोरेखित करणारी आहे.

अर्थात, अनुभवी खेळाडूंकडे डोळेझाक करता येत नाही. रविचंद्रन अश्विनने स्वत:च्या कामगिरीतून हे दाखवून दिले. चार वर्षे या जादुई फिरकी गोलंदाजाकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर निवडकर्त्यांनी चूक सुधारली. अश्विनने मैदानावर आल्या आल्या मालिकेत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने यावर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आणि अनिल कुंबळे आणि हरभजनसिंग यांचे विक्रम मोडले. भारतीय भूमीवर ३०० बळी पूर्ण करणारा तो आता दुसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अनिल कुंबळेने हा करिष्मा केला होता. टीम इंडियाला यानंतर द. आफ्रिकेचा गड सर करण्याचे आव्हान असेल. ठरल्यानुसार दौरा झाल्यास कसोटी विजयाच्या कहाणीची पुनरावृत्ती द. आफ्रिकेतदेखील होऊ शकणार आहे. त्यासाठी द्रविडच्या मार्गदर्शनात कोहली ॲन्ड कंपनी सज्ज असेल.

Web Title: The fire of revenge for the Test defeat finally calmed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.