सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात

By सुधीर महाजन | Published: July 6, 2019 07:56 PM2019-07-06T19:56:29+5:302019-07-06T20:00:20+5:30

‘झीरो बजेट शेती’ हे ऐकून काल रात्रभर गंगाधरच्या स्वप्नात शून्यांनी फेर धरला होता. जेव्हा-जेव्हा जाग येई त्या-त्या वेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त शून्य दिसत होते.

Gangadhar found in the trap of Zero budget farming | सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात

सापडला गंगाधर झीरोच्या सापळ्यात

googlenewsNext

- सुधीर महाजन

‘झीरो बजेट शेती’ हे ऐकून काल रात्रभर गंगाधरच्या स्वप्नात शून्यांनी फेर धरला होता. जेव्हा-जेव्हा जाग येई त्या-त्या वेळी त्याच्या डोळ्यासमोर फक्त शून्य दिसत होते. सकाळी उठला तरी जगभर शून्याचा पसारा पसरला आहे, अशी त्याची मनोभावना झाली. शेतावर गेला तर कोरड्या विहिरीकडे नजर जाताच त्याला विहिरीऐवजी शून्यच दिसले. दुपारी बायकोने भाकरी वाढली तर भाकरी न दिसताच पुन्हा शून्यच. संध्याकाळी घरी येताना रस्त्यावरच्या वाहनांची चाकेही शून्यच. अशा शून्याच्या गर्तेत सापडलेला गंगाधर शून्यावस्थेत पोहोचला. जणू काही त्याची भावसमाधीच लागली. घरी येताच बायकोने चूल पेटवून चहा केला. कप पुढे केला तरी हा शून्यावस्थेतून बाहेर आलेला नव्हता. ‘अहो चा घ्या’ असे दोन-तीनदा म्हणूनही हा पुतळ्यासारखा स्तब्धच. शेवटी तिने गरम कप त्याच्या ओठावर टेकवला आणि चटका बसताच तो भानावर आला. तिला वाटले, आताच अमावास्या झाली. ‘वारं लागलं का’? मनातून घाबरली, पण याने कप हातात घेताच सावरली. हे यडं कुठं हरवलं याचा विचार मनात आला.

चहा प्यालानंतरही गंगाधर गप्प गप्प होता, न त्याने विडी पेटवली ना मंदिराकडे गेला. पुन्हा तंद्री लावून बसला, तशी ती त्याच्या खणपटाला बसली. तुम्ही बोलत नाही, झालं काय? असं विचारू लागली. हा आत्महत्येचा विचार तर करीत नाही हे मनात येताच चरकली. त्याच्या लक्षात आलं, तो म्हणाला, मला सगळीकडे झीरो-झीरोच दिसतात. आता पावसाला उशीर झाला. पडला तर आपण यावर्षीच झीरोची पेरणी करू, हे ऐकून ‘हे मढं असं कसं आरबळतंय’ असं म्हणत तिने त्याला गदागदा हलवलं आणि तोंडाचा दांडपट्टा सुरू केला तसा तो भानावर आला. शून्याचा फास ढिला झाल्याची जाणीव झाली आणि तो बोलायला लागला.

ती सरकारमधली निर्मलाबाई म्हणाली, आता ‘झीरो बजेट शेती’ करायची वेळ आली. आता तिचा झीरो कोणता, याचा शोध लावतो. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर सगळी शेतीच झीरो झाली. आता हे कोणते झीरो बजेट? आता बी-बियाणाला पैसा नाही, म्हणजे आपणही झीरोच झीरो देऊन बी मिळत का खत? मशागत झीरो फेकून कशी होणार? मजुरांना झीरो पैसे चालतील का? आता त्या निर्मलाबार्इंचा झीरो नेमका कोणता, हेच समजत नाही. झीरोचा बल्ब तरी लागतो; पण या झीरोने माझ्या डोक्यात सगळा अंधारच केला, म्हणून मी बावचळून गेलो. आता तूच सांग दातावर मारायला पैसा नाही, बँक उभी करीत नाही, सावकार पायरी चढू देत नाही, शेतीला तर पैसा लागतो. माझा बाप-आजा शेती करायचा तेव्हा घरचं बी होतं. दावणीला जनावरं होती म्हणून महामूर शेणखत होतं. रोगराई नव्हती. नोकरदारांचा जसा एक तारखेला पगार होतो, तसा पाऊस ७ जूनला हजर व्हायचा अन् दसरा-दिवाळी करून जायचा. नदी-नाले वाहते होते. अशी आबादानी होती. आता दावं घ्यायचं तरी पैसा फेकावा लागतो अन् ही बाई म्हणते झीरो बजेट शेती करायची. ढेकळं तुडवत, माती खात आयुष्य गेले, पण मला कळलं नाही आता या बाईकडून शिकावं म्हणतो ?

Web Title: Gangadhar found in the trap of Zero budget farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.